वडिलांचा कोरोनाने मृत्यू, कॅन्सरमुळे आईही गेली; 2 लेकरांना कलेक्टरनी दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 12:51 PM2023-05-29T12:51:28+5:302023-05-29T12:53:27+5:30
वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि यापूर्वी आईनेही कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. ते दोघेही आता अनाथ झाले आहेत.
दोन निष्पाप लेकरांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. यानंतर आता मुलांकडे आयुष्य जगण्यासाठी ना घर उरले ना कोणताच आधार. पण चांगलं शिक्षण घेऊन अधिकारी होण्याची जिद्द मात्र अजूनही आहे. हीच जिद्द पाहून इंदूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुलांना हॉस्टेल, शिक्षण आणि दरमहा पाच हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जनसुनावणी दरम्यान, 13 वर्षांची मुलगी कोमल आपल्या 9 वर्षांच्या भावासोबत आपली बाजू मांडण्यासाठी इंदूरच्या डीएमसमोर पोहोचली. त्यांनी सांगितले की, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि यापूर्वी आईनेही कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला. ते दोघेही आता अनाथ झाले आहेत. जनसुनावणीदरम्यान मुलीने आपल्या असहायतेची गोष्ट डीएम इलैया राजा टी यांना सांगितली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले.
बहिणीने सांगितले की, तिच्याकडे राहण्यासाठी छप्पर नाही आणि जीवन जगण्यासाठी कोणताही आधार नाही. तिला आणि तिच्या भावाला शिक्षण घेऊन तुमच्यासारखे अधिकारी व्हायचे आहे. 13 वर्षांची कोमल आणि तिचा 9 वर्षांचा भाऊ अंश यांची गोष्ट ऐकून कलेक्टरनी दोन्ही मुलांची वसतिगृहात राहण्याची व्यवस्था करून शिक्षणाची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवली.
रेड क्रॉसच्या माध्यमातून दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची व्यवस्था केली आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांना इतर प्रकारची मदत देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर कोमल आणि अंश दोघेही खूश आहेत. तर कोमलने सांगितले की आता ती अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करू शकते. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.