आयकर विभागाच्या इंदूर शाखेने इंदूर, रतलाम आणि खरगोन येथे एकाच वेळी केलेल्या तीन कारवाईत २५ कोटी रुपयांची रोकड, सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ८.५ कोटी रुपयांची रोकड, ११.८४ कोटी रुपयांचं १६ किलो सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू आणि हिरे यांचा समावेश आहे. हुंडी (कॅश लोन) आणि हवाला व्यवसायात गुंतलेल्या कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
इंदूरमध्ये, दिलसुख कटारिया आणि त्याचे तीन भाऊ चालवणाऱ्या कटारिया फायनान्सच्या जानकी नगर आणि नौलाखा येथील कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. कटारिया बंधू हे या भागातील सर्वात मोठे 'हुंडी' ऑपरेटर मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ कोटी रुपये रोख, ९.३२ कोटी रुपयांचं १३ किलो सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
६० तास सुरू होती कारवाई
खरगोनमध्ये बिस्तान रोडवरील महाजन कुटुंबाच्या मालकीच्या आरएम मिलवर आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. येथे १.४ कोटी रुपये रोख आणि १.४८ कोटी रुपये किमतीचे २ किलो सोन्याचे दागिने टीमने जप्त केले. खरगोनमध्ये चार ठिकाणी सुरू असलेले आयकर विभागाचे छापे जवळपास ६० तासांनंतर तिसऱ्या दिवशी संपले.
बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर आणि महाराष्ट्रातून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल ६० तास सतत कारवाई केली. यावेळी आयकर विभागाच्या पथकाने एकाच वेळी चारही फर्ममधील कागदपत्रांची झडती घेतली.
खरगोन शहरातील श्री प्रभु ट्रेडर्स, श्री हरी एंटरप्रायझेस, राधाकृष्ण मथुरालाल दाल मिल आणि आरएम ईशान कोल्ड स्टोरेजसह चार ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेरसह महाराष्ट्रातील ३० हून अधिक आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बुधवारपासून कारवाई करत होते.
रतलामच्या हवाला ऑपरेटरवर कारवाई
आयकर अधिकाऱ्यांनी रतलामचा सर्वात मोठा हवाला ऑपरेटर मनीष पटवा याच्यावरही कारवाई केली. मनीष यापूर्वीच आयकर विभागाच्या रडारखाली आला होता, पण त्याला पकडता आलं नाही. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत वॉश बेसिनजवळून रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. पटवा येथून १.७ कोटी रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आली.