देशात निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचारसंहिताही लागू झाली आहे. याच दरम्यान, मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसएसटी पथकाने दारू व्यावसायिकाच्या कारमधून तब्बल 56 लाख रुपये जप्त केले आहेत. ही कार इंदूरमधील एका मोठ्या व्यावसायिकाची असल्याचं सांगण्यात येत आहे. कारवाई करत राजेंद्र नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
डीसीपी विनोद मीणा यांच्या पथकाने या प्रकरणाच्या तपासादरम्यान चोइथराम मंडी येथे फॉर्च्युनर कार अडवली होती. ही कार व्यावसायिक रमेश चंद्र राय यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही गाडी ते स्वतः चालवत होते. पोलिसांनी कार थांबवून झडती घेतली असता, त्यातून 56 लाख रुपये जप्त करण्यात आले.
पोलिसांनी चौकशी केली असता दारू व्यावसायिकाने आपण धार येथून परतत असून व्यवसायासंदर्भात धार येथून पैसे आणल्याचं सांगितलं. या प्रकरणी राजेंद्र नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सियाराम गुर्जर यांनी सांगितलं की, त्यांनी रक्कम जप्त केली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रमेश चंद्र राय यांची गाडी थांबवून रक्कम जप्त करताच त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून गाडी सोडवून घेतली, मात्र नवीन डीसीपींनी याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दारू व्यावसायिकाकडून पैसे मिळाल्याची घटना रात्री घडल्याचं म्हटलं जात आहे. सकाळी या प्रकरणाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे आणि अशा परिस्थितीत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या लोकांवर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत.