इंदूर : कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. बडेबडे देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. आता कोरोनाने आपल्या देशातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्याला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या दिवसांत सरकारने काही नियमांचे पालनही करायला सांगितले आहे. मात्र, असे असतानाही आपल्या देशातील बरेच लोक अजूनही रस्त्यांवर फिरताना आणि निमांना पार हरताळ फासताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर इंदूर पोलिसांनी आता जबरदस्त फंडा सुरू केला आहे. यातून ते जनतेत जागृतीही करताना दिसत आहेत.
इंदूरमधील पोलिसांचे काही स्वयंसेवक आता भूताच्या वेशात रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जे लोक लॉकडाऊनचे पालन करत नाहीत त्यांना हे स्वयंसेवक घाबरवून घरी पाठवत आहेत.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विजय नगर पोलिसांनी काही सामाजिक कार्याकर्त्यांची मदत घेतली आहे. हे कार्यकर्ते आता झोपड्या आणि गर्दी असलेल्या कॉलनीजमध्ये जाऊन लोकांना घाबरवत आहेत आणि त्यांना कोरोनासंदर्भात माहिती देऊन घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. यासाठी त्यांनी 6 सामाजिक कार्यकर्त्यांचा एक गट तयार केला आहे.
पोलिसांनी तयार केलेला यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत इंदूरमध्ये 89 जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे.