ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 22 - सर्व राज्यांमध्ये असणारी एक मुख्य समस्या म्हणजे वाहतूक नियंत्रण. वाहतुकीच्या नियमांचं सर्रासपणे होणारं उल्लंघन वाहतूक पोलिसांसाठी असलेला मोठा मनस्ताप आहे. ट्राफिक सिग्नलवर वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिसांची चांगलीच दमछाक होतं. यासोबतच काही आजारही उद्भवतात. मात्र मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या इंदोरने यातून मार्ग काढत एक भन्नाट कल्पना अंमलात आणली आहे. इंदोरमध्ये चक्क रोबोट वाहतुकीचं नियंत्रण करत आहे. ट्राफिक सिग्नलवर उंचच्या उंच असलेला हा रोबोट एखाद्या पोलिसाप्रमाणे वाहनचालकांना इशारे करत आहे.
यासाठी वाहतूक पोलिसांनी एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजशी हातमिळवणी केली आहे. पहिल्यांदाच शहरात अशाप्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. शहरातील व्यस्त ठिकाण असलेल्या रस्त्यावर 14 फूटांचा धातूपासून तयार करण्यात आलेला रोबोट उभारण्यात आलेला आहे. हा रोबोट वाहतुकीवर लक्ष ठेवत असून नियंत्रण करत आहे.
श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन प्राध्यापकांनी हा रोबोट तयार केला आहे. राहुल तिवारी आणि अनिरुद्ध शर्मा यांनी हा रोबोट तयार केला असून यासाठी तब्बल दोन वर्ष लागली. या प्रोजेक्टसाठी एकूण 15 लाखांचा खर्च आला.
डीआयजी हरिनारायणचरी मिश्रा यांनी हा प्रयोग खूपच यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. तसंच माजी पोलीस महानिरीक्षक व्ही के अग्निहोत्री यांनी सांगितलं की, "ही संकल्पना खूपच चांगली आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण करण्यास खूप मदत मिळेल. तसंच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणा-यांही नोंद ठेवणं सोप्प होईल".
सामान्यांमधून यासंबंधी संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी हा अत्यंत चांगला प्रयोग असल्याचं म्हटलं आहे, तर काहीजणांनी इतका खर्च करण्याची गरज काय ? असा सवाल विचारला आहे. "जिथे लोक पोलिसांना जुमानत नाहीत, तिथे एका रोबोटच्या इशा-यावर लोक थांबतील असं वाटतं का. हे फक्त मनोरंजनाचं एक साधन आहे"",अशी प्रतिक्रिया स्थानिक नंदिनी सुंदर यांनी दिली आहे.