इंदूरच्या एका चौकात सिग्नलजवळ भर रस्त्यात डान्स केलेल्या मॉडल श्रेया कालरा हिनं पोलिसांची माफी मागितली आहे. तिनं एमडीएच कंपाउंड स्थित वाहतूक विभागामध्ये हजेरी लावून व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. श्रेया हिनं डीएसपी यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाची माफी मागितली असून अशी चूक पुन्हा होणार नाही याची ग्वाही दिली आहे.
सवंग लोकप्रियतेसाठी भर रस्त्यात डान्स करत व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शुक्रवारी संध्याकाळी मॉडेल श्रेया कालरा हिनं डीएसपी उमाकांत चौधरी यांची भेट घेतली आणि घडलेल्या घटनेबाबत माफीनामा सादर केला. व्हिडिओ करण्यामागचा उद्देश वेगळाच होता पण तो चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियात व्हायरल झाला असं तिनं आपल्या जबाबात म्हटलं आहे. याशिवाय वाहतूक विभागासोबत काम करुन वाहतुकीच्या नियमांबाबत जगजागृतीचं काम करण्याचीही तयारी तिनं दाखवली आहे.
नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं याच उद्देशानं व्हिडिओ शूट केला होता. पण तो चुकीच्या पद्धतीनं व्हायरल झाला आहे. झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागते, असं श्रेयानं म्हटलं आहे. दरम्यान, तिच्याविरोधात याआधीच गुन्ह्याची नोंद झालेली आहे.
ट्राफिक सिग्नलवर असा डान्स करणं आहे गुन्हामॉडल श्रेया हिनं एका चौकातील सिग्नलवर केलेला डान्स सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटिझन्समध्ये एक ट्रेंडच पाहायला मिळत होता. श्रेया प्रमाणेच इतर नेटिझन्सही सिग्नलवर डान्स करतानाचे असे व्हिडिओ शूट करुन अपलोड करण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे श्रेया हिच्या अडचणीत वाढ झाली आणि तिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. माझा व्हिडिओ पाहून त्याचा ट्रेंड सेट व्हावा असा अजिताबत यामागचा उद्देश नव्हता, असं श्रेया हिनं म्हटलं आहे. असं करणं कायद्यानं गुन्हा आहे. यापुढील काळात वाहतूक विभागासोबत मिळून वाहतूक नियमांच्या जनजागृतीचं काम करणार आहे, असंही तिनं म्हटलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?गेल्याच आठवड्यात इंदूरच्या विजय नगर ठाण्याच्या हद्दीत रसोमा चौकात एका तरुणीचा डान्स पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. आपल्या वाढदिवसानिमित्त वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी एक तास सेवा देण्याची ही नवी मोहिम असल्याचं यात दाखवण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात हे सारंकाही सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलं गेलं असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडीयात व्यक्त होऊ लागल्या. पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत मॉडलविरोधात गुन्ह्याची नोंद केली.