Indore Well Accident : मौत का कुआं; इंदूरच्या विहिरीने 36 जणांना गिळले, दोषींविरोधात कारवाईला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 01:57 PM2023-03-31T13:57:58+5:302023-03-31T14:05:36+5:30

Indore Well Accident : इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरातील विहीरीवरील छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

Indore Well Accident : Well of death, Indore well accident 36 people died, action initiated against culprits | Indore Well Accident : मौत का कुआं; इंदूरच्या विहिरीने 36 जणांना गिळले, दोषींविरोधात कारवाईला सुरुवात

दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

googlenewsNext

Indore Well Accident : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीचे छत कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला. सुमारे 22 तास चाललेल्या या बचावकार्यात 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. मंदिराच्या पायरीवरुन बेपत्ता झालेल्या सुनील सोलंकी या शेवटच्या व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर मदत आणि बचावकार्य थांबवण्यात आले. इंदूरचे आयुक्त पवन शर्मा यांनी मीडियाला सांगितले की, 'सर्व बेपत्ता लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, तरीदेखील मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी विहिरीतील सर्व पाणी बाहेर काढून पाहिले जाणार आहे.'

दोषींवर कारवाई सुरू 
दुसरीकडे या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. ही घटना घडलेल्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सेवाराम गलानी आणि सचिव यांच्या विरोधात सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदूरचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी याला दुजोरा दिला आहे. यासोबतच हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेचे इमारत अधिकारी आणि इमारत निरीक्षक यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

1 वर्षापूर्वी इशारा दिला होता 
वर्षभरापूर्वी खासगी मंदिराच्या बांधकामावर प्रशासनाने आक्षेप घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यासोबतच पायरीवरील बांधकामाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र मंदिर समितीने बांधकाम थांबवण्याऐवजी त्याला जीर्णोद्धार म्हटले आणि उलट प्रशासनावर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. त्या निष्काळजीपणामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली. इंदूर महानगरपालिकेनेही मंदिरावरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात 2 महिन्यांपूर्वीही नोटीस जारी केली होती. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम गलानी यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र कारवाई झाली नाही.

दोषींवर कारवाई होणार- मुख्यमंत्री 
इंदूर मंदिर दुर्घटनेतील लोकांचा मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हणत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकार तपासानंतर दोषींवर जबाबदारी निश्चित करेल. अपघातात जखमी झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासोबत इंदूरला आलेले मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, प्रशासनाने अपघाताची दंडाधिकारी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतर दोषींवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करू.

अधिकाऱ्यांना कडक कारवाईच्या सूचना
एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिवराज यांनी राज्यभरातील कोणत्या विहिरी आणि स्टेपवेल असुरक्षित पद्धतीने झाकून बांधल्या आहेत आणि कोणत्या कूपनलिका उघड्या ठेवल्या आहेत, याची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ते म्हणाले, 'इंदूर मंदिरातील घटनेसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, अशी आमची इच्छा आहे. तपासणीदरम्यान खासगी किंवा सरकारी जमिनीवर विहीर, स्टेपवेल किंवा कूपनलिका धोकादायक स्थितीत आढळून आल्यास संबंधित जमीन मालक किंवा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.

Web Title: Indore Well Accident : Well of death, Indore well accident 36 people died, action initiated against culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.