नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रदूषणाचा स्तर वाढतच चालला आहे. त्यात राजधानी दिल्लीत प्रदूषणानं उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारबरोबर सीएनजी आणि पीएनजी पुरवठादार कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत.दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रदूषणाचा वाढता स्तर पाहता सीएनजी आणि पीएनजी पुरवणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड(IGL)नं एक भन्नाट ऑफर वाहन चालकांना उपलब्ध करून दिली आहे. IGLनं गाड्यांमध्ये सीएनजी किट बसवणाऱ्या वाहन चालकाला 4 हजार रुपयांपर्यंत मोफत सीएनजी देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचं नाव 'पहिल्यांदा या आणि पहिल्यांदा मिळवा' ठेवण्यात आलं आहे. ही योजना पहिल्यांदा सीएनजी किंवा पीएनजी किट लावणाऱ्या पहिल्या 2 हजार ग्राहकांसाठी वैध आहे.
- 4 हजार रुपयांचा मोफत सीएनजी- या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पेट्रोल कारमध्ये सीएनजीचा किट बसवावा लागणार आहे. सीएनजी किट लावल्यानंतर गाडीचं आरसी बुक आणि एक टेस्टिंग सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. हे सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर आयजीएल आपल्याला 2 हजार रुपयांचं प्री-लोड स्मार्ट कार्ड आणि 2 हजार रुपयांची वैध कंपनी कूपन देते. आरसीची कॉपी आणि वैध हायड्रो टेस्टिंग सर्टिफिकेट आपल्याला दिल्ली-एनसीआरच्या सीएनजी पंपांवर जमा करावं लागणार आहे. 2 हजार रुपयांच्या प्री-लोडेड स्मार्ट कार्डानं आपण गाडीमध्ये सीएनजी टाकू शकता.
- 5 फेब्रुवारी 2019पर्यंत ही योजना लागू- ही योजना 1 डिसेंबर 2018 ते 5 फेब्रुवारी 2019पर्यंत वैध आहे. सीएनजी फिटेड/कन्वर्टेड कारसाठी 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019पर्यंत लागू असेल. ही सुविधा दिल्ली-एनसीआरच्या 11 सीएनजी पंपांवर सुरू करण्यात आली आहे.