हरिद्वार:हरिद्वारमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका उद्योगपतीनं व्यवसायात नुकसान झाल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. उद्योगपती हैदराबादचा रहिवासी असून, कारखाना बंद पडल्यानंतर तो हरिद्वारला आत्महत्या करण्यासाठी आला. यासाठी त्यानं हरिद्वारमधील एकाहॉटेलमध्ये खोली घेऊन आत्महत्या करत असल्याचा मेसेज कुटुंबियांना पाठवला. त्यानंतर कुटुंबानं पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तातडीने दखल घेत अनेक हॉटेल्समध्ये पाहणी केली आणि अखेर त्या उद्योजकाचा जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल गुप्ता असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याची हैदराबादमध्ये एक पंखा तयार करण्याची फॅक्टरी आहे. काही दिवसांपूर्वी त्याची फॅक्टरी बंद पडली आणि यामुळे त्याला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. यानंत आत्महत्या करण्यासाठी तो हरिद्वारमध्ये आला. यानंतर त्यानं आपल्या कुटुंबियांना आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवला.
यानंतर कुटुंबियांनी अतुलला फोन करुन खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. यानंतर कुटुंबियांनी तात्काळ डीजीपी अशोक कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी हरिद्वार पोलिसांना याची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अतुलचा शोध सुरू केला. 50 पेक्षा जास्त हॉटेल्स शोधल्यानंतर अखेर त्याला पत्ता लागला आणि पोलिसांनी त्याला वाचवलं.