मुंबई - प्रख्यात उद्योगपती आणि शापूरजी पालनजी ग्रुपचे चेअरमन पालनजी मिस्त्री यांचं निधन झालं आहे. पालनजी मिस्त्री यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, सोमवारी रात्री मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पालनजी ग्रुप उभा करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगतामध्ये शोकाचं वातावरण आहे.
पालनजी मिस्री हे सुमारे २९ अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीचे मालक होते. त्यांचा देशातील आघाडीच्या मोठ्या उद्योगपतींमध्ये समावेश होता. त्यांच्या कुटुंबाकडील बहुतांश संपत्ती ही टाटा सन्समधील भागीदारीमधून आलेली आहे. शापूरजी पालनजी ग्रुपचा बहुतांश व्यवहार हा इंजिनियरिंग कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, रियल इस्टेट, वॉटर, एनर्जी आणि फायनान्शियल सर्व्हिस क्षेत्रामध्ये पसरला आहे.
शापूरजी पालनजी समुहामध्ये सुमारे ५० हजार कर्मचारी आहेत. तसेच हा समूह जगातील ५० देशांमध्ये व्यवसाय करतो. तसेच टाटा समुहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये पालनजी कुटुंबाचा १८.४ टक्के हिस्सा आहे.
पालनजी मिस्त्री यांनी २००४ मध्ये मोठा मुलगा शापूर यांच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवली होती, तसेच स्वत: सहाय्यकाच्या भूमिकेत गेले होते. गेल्या वर्षी या समुहाने युरेका फोर्ब्स नावाने सुरू असलेल्या आपल्या कंझ्युमर ड्युरेबल बिझनेसला एका अमेरिकी फर्मला विकले होते.