पिंपरी (पुणे) : ‘हमारा बजाज’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य निश्चित करून आपल्या कार्यकर्तत्वाने ते प्रत्यक्षात उतरवून दाखविलेले द्रष्टे उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज (८३) (Rahul Bajaj) यांचे अल्पशा आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी दुपारी निधन झाले. गेल्या महिनाभरापासून कर्करोगाशी सुरू असणारा लढा अपयशी ठरला. बजाज यांच्या निधनाने उद्योगजगतावर शोककळा पसरली आहे.
राहुल बजाज यांचे पार्थिव रविवारी सकाळी साडेअकरा वाजता आकुर्डी येथील कंपनीत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सर्वसामान्यांच्या वाहनविषयक गरज ओळखून स्कूटरपासून ते भन्नाट स्पोर्टस् बाईक बनवून सर्वसामान्यांच्या जीवनाला बजाज यांनी गती प्राप्त करून दिली. वर्षभराचे वेटींग असायचे तरीही लोकं पैसे भरुन ‘बजाज बुक’ केली असे अभिमानाने सांगायचे. बजाज ही केवळ कंपनी नव्हती तर सर्वसामान्यांसाठी ‘हमारा बजाज’ बनल्याचे ते द्योतक होते. या किमयेचे राहुल बजाज हेच जादुगार होते. त्यांच्या कारकिर्दीतील ‘एम फिप्टी’ आणि ‘एम एटी’ या दोन बाईकनी तर विक्रीचा विक्रम नोंदविला होता.
आकुर्डी येथे बजाज यांचे निवासस्थान आहे. कंपनीच्या आवारातच बजाज परिवार वास्तव्यास आहे. बजाज महिनाभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांना कर्करोगाबरोबरच न्यूमोनिया आणि हृदयविकाराचाही त्रास होत होता. त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
बजाज यांनी सर्वसामान्य माणसाच्या गरजा अचूक हेरुन व्यवसायाशी सांगड घातली. तत्कालीन मुंबई प्रातांचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी ढकलगाडीवर बंदी आणली. त्यावेळी नवलमल फिरोदिया यांनी ऑटो रिक्षा बाजारात आणली होती. बजाज यांनी ऑटो रिक्षामध्ये सुधारणा करून रिक्षाच्या उत्पादनाला चालना दिली. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला दळणवळणासाठी हक्काचे साधन मिळालेच, शिवाय लाखो लोकांना रोजगार मिळून ते आत्मनिर्भर झाले. एवढेच नव्हे तर, रिक्षा हे भारतातून सर्वाधिक देशांमध्ये निर्यात होणारे आघाडीचे वाहन बनले.
अल्प परिचय -- पश्चिम बंगालमधील मारवाडी कुटुंबात १० जून १९३८ रोजी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे ते नातू. त्यांचे वडील कमलनयन बजाज यांच्याकडून उद्योगाचा वारसा त्यांना मिळाला. सेंट स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात बीए केले. मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चं शिक्षण घेतले. उमेदीच्या काळात त्यांनी बजाज इलेक्ट्रिकल कंपनीत तीन वर्षे काम केले.
- पारंपरिक उद्योगाची धुरा १९६५ मध्ये त्यांनी हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली ३० वर्षांत बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. बजाजने दुचाकी विक्रीत देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला. त्यांनी ४० वर्षे उद्योगाचे नेतृत्व केले. राजीव बजाज यांच्याकडे २००५ मध्ये कंपनीच्या सूत्रे सोपवली. २००१ मध्ये बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. २००६ ते २०१० या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते.
‘हमारा बजाज’ची कथा -त्या काळात बजाज स्कूटरची कायनेटिक होंडा व एलएमएल व्हेस्पा या गाड्यांसाेबत स्पर्धा सुरू हाेती. बजाजच्या स्कूटर जुनाट वाटत असल्याने नव्याने ब्रॅंडिंगची कल्पना सुचली. बजाज स्कूटर देशातील सर्व घटक वापरत असल्याने सर्वांना आपलेसे वाटेल असे चित्रण जाहिरातीत केले. त्यातून ‘हमारा बजाज’ या ओळी शब्दबद्ध झाल्या. आणि नवा इतिहास घडला. हे शब्द प्रत्येकाच्या हृदयात कोरले गेले.
महान उद्योजक गमावलाख्यातनाम उद्योगपती राहुल बजाज यांनी उद्योग व वाणिज्य क्षेत्रात केलेली महत्वाची कामगिरी नेहमीच सर्वांच्या लक्षात राहिल. राहुल बजाज यांनी व्यवसायात यश मिळविलेच पण त्यांनी केलेली समाजसेवाही उल्लेखनीय आहे. त्यांच्या जाण्याने एक महान उद्योजक आपण गमावला आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
मध्यमवर्गीयांचे आयुष्य बदलले स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल यांनी दुचाकी तंत्रज्ञानामुळे मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणले. परवडणाऱ्या वाहनामुळे गतिशीलता वाढली. ते सामाजिक-आर्थिक बदलाचे साधनही बनले. भारताने परोपकारी आणि तरुण उद्योजकांसाठीचा दीपस्तंभ गमावला आहे.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
वाहन उत्पादनात क्रांती घडविली राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात क्रांती आणली. जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही, तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री