ED Raid Updates: सक्तवसुली संचालनालयाने प्रसिद्ध उद्योगपतीला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध कॉन्कॉस्ट स्टील अँड पावर लिमिटेड कंपनीचे मालक संजय सुरेखा यांच्यावर ईडीने बुधवारी (१८ डिसेंबर) मध्यरात्री अटकेची कारवाई केली. ईडीने कंपनीशी संबंधित १३ ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर ही कारवाई केली. छाप्यात ईडीने कोट्यवधी रुपयांचे दागिने, आणि अलिशान चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. (Industrialist Sanjay Sureka Arrested by enforcement directorate)
ईडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोलकाता स्थित कंपनीच्या विभागीय कार्यालयासह १३ मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. ६००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने ही मोठी कारवाई केली असून, उद्योग जगततात खळबळ उडाली आहे.
६००० कोटी घोटाळा प्रकरण काय?
ईडीच्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँकेने तक्रार दिल्यानंतर सीबीआय, कोलकाताच्या बीएसएफबी अर्थात बँकिंग सिक्युरिटीज फ्रॉड ब्रँचने संजय सुरेखा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुरेखा यांची कंपनी पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेशमध्ये लोखंड, स्टील आणि सळई निर्मिती करते.
छापेमारीतून समोर आलेल्या माहितीनुसार, ग्रुप प्रमोटरने कर्मचारी, नातेवाईक आणि इतर सहकाऱ्यांच्या नावाने शेल (बोगस) कंपन्या सुरू केलेल्या आहेत. बँकेतून मिळालेले कर्ज दुसऱ्या ठिकाणी गुंतवण्यासाठी आणि काळा पैसा वैध बनवण्यासाठी या कंपन्या सुरू करण्यात आलेल्या आहेत.
बँकेतून कर्ज घेऊन त्या पैशाचा वापर खासगी संपत्ती म्हणजे जमीन आणि गाड्या घेण्यासाठी करण्यात आला, असे ईडीने छापेमारीनंतर दिलेल्या माहितीत सांगितले. संजय सुरेखा यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे काही कागदपत्रेही मिळाल्याचे ईडीने सांगितले. तब्बल ६००० हजार कोटींचा हा बँक घोटाळा आहे.
ईडीला सापडले सोन्याच्या दागिन्यांचे घबाड
ईडीच्या कोलकाता टीमने छापेमारी केली. १३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांना सुरेखा यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दाखवणारी अनेक कागदपत्रे मिळाली. त्याचबरोबर सोने आणि सोन्याचे दागिने आढळून आले. त्याची किंमत ४.५ कोटी रुपये असून, आठ अलिशनान कारही ईडीने जप्त केल्या आहेत.