भारतात गरीब आणखी गरीब होत आहेत, श्रीमंत आणखी श्रीमंत. आज देशातील अब्जाधीशांचा आकडा हेच सांगत आहे. देशातील आर्थिक विषमता चिंताजनक प्रकारे वाढू लागली आहे. भारतात अब्जाधीशांची संख्या १४२ वर गेली असून याच लोकांकडे देशाच्या ४० टक्के संपत्तीचा वाटा आहे. दुसरीकडे देशातील ८४ टक्के कुटुंबांचे उत्पन्न कमी झाले आहे.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum) च्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी Oxfam ने अहवाल दिला आहे. यानुसार भारतात २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या वर्षभरात ४० ने वाढली आहे. २०२१ मध्ये ही संख्या १०२ होती. या १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती वाढून 720 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. ही देशाच्या गरीबांच्या संपत्तीपेक्षाही जास्त आहे.
कोरोनामुळे लोकांचे उत्पन्न बुडालेले असताना दुसरीकडे अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे लोकांचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या. कंपन्या बंद करण्याची वेळ आली, परंतू दुसरीकडे उद्योजकांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.
अमेरिका, चीननंतर भारत...ऑक्सफेमच्या अहवालानुसार भारत अब्जाधीशांच्या यादीत आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अमेरिकेत जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात. यानंतर चीनचा नंबर लागतो. परंतू फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झरलँड या तीन देशांमध्ये मिळून जेवढे अब्जाधीश नाहीत, तेवढे एकट्या भारतात झाले आहेत.
ऑक्सफेम इंडियाचे सीईओ Amitabh Behar यांनी सांगितले की, ही आर्थिक असमानता फक्त भारतातच नाही तर जगातही आहे. कोरोना महामारी हे कारण बनले आहे. आर्थिक असमानतेमुळे जगभरात दिवसाला २१ हजार मृत्यू होत आहेत. म्हणजेच दर चार सेकंदाला एक मृत्यू होत आहे.