Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अशातच अमेरिका, भारत, ब्रिटन व इतर देशांकडून अफगाणिस्तानातील आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याची मिशन हाती घेण्यात आलं आहे. यातच अफगाणिस्तानातील काबुलहून १६८ जणांना घेऊन निघालेलं भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज गाझियाबादच्या हवाई तळावर दाखल झालं. यात सुखरुपरित्या भारतात परतल्यानंतर सर्व नागरिकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. पण एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर सी-१७ हे विमान उतरलं असून यातून मायदेशात परतलेल्या १६८ नागरिकांना सध्या याच ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्यांची पुढील कागदपत्रांची पडताळणी आणि आरटीपीसीआर चाचणीची प्रक्रिया केली जात आहे. भारतात परतलेल्या या १६८ जणांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. यातच एका चिमुकलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
भारतात सुखरुपपणे दाखल झाल्याचा आनंद जसा आपल्या आईच्या चेहऱ्यावर दिसून लागला तसं चिमुकली मुलगी देखील खूश झाली. तिनं तिचं निरागस प्रेम आणि आनंद आईच्या कुशीत असलेल्या चिमुकल्या बाळासोबतही व्यक्त केला. निरागस प्रेमाचा हा व्हिडिओ खूप काही सांगून जाणारा आहे. योगायोगानं आज रक्षाबंधनाचा सण असून आजच्याच दिवशी एका चिमुकल्या बहिण-भावाची तालिबान्यांच्या तावडीतून सुटका झाल्याचं हा क्षण नक्कीच डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरत आहे.