देशामध्ये ३०० जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात या राज्यांतील कोरोना स्थिती चिंतेचा विषय बनली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गात ३० डिसेंबर रोजी १.१ टक्के वाढ झाली होती. त्याचे प्रमाण बुधवारी ११.०५ टक्के झाले आहे.
जगात १० जानेवारी रोजी ३१.५९ लाख कोरोनाबाधित आढळले. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. १९ राज्यांमध्ये प्रत्येकी दहा हजारांहून सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील कोरोना स्थिती चिंता वाढविणारी आहे. त्यामुळे पात्र गटातील सर्व व्यक्तीनी प्राधान्याने लस घेतली पाहिजे व प्रतिबंधक उपाय पाळले पाहिजेत, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. ‘ओमायक्राॅन’चा संसर्ग म्हणजे साधा ताप व खोकला नव्हे. या संसर्गाकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे व डॉक्टरांकडून नीट उपचार करून घ्यावेत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. सर्वांनी मास्क वापरावा व शारीरिक अंतर राखावे, असेही त्यांनी सांगितले.
स्थिती सुधारल्यास निर्बंध शिथिल होतील -आरोग्यमंत्री
दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असून या स्थितीमध्ये आणखी सुधारणा झाल्यास निर्बंध शिथील करण्यात येतील, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गेल्या रविवारी दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या २२ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर तेवढा आकडा दिल्लीने ओलांडला नाही. सोमवारी १९१६६ तर मंगळवारी २१,२५९ कोरोनाबाधित आढळले आहेत. ही संख्या वाढत नसल्याने बाधितांच्या वाढीचा वेग स्थिर झाल्याचा दावा जैन यांनी केला आहे.