श्रीनगर, दि. 27 - सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावत आहेत. गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले. अजूनही या ठिकाणी ऑपरेशन संपलेले नसून कारवाई सुरु आहे.
नियंत्रण रेषेवर मागच्या अनेक महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कर त्याच भाषेत प्रयुत्तर देत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यादेखील भारतीय लष्कराने उद्धवस्त केल्या आहेत. तरीही पाकिस्तान अजून वठणीवर आलेला नाही. सीमेवर दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.
मागच्या सहा महिन्यात सुरक्षा दलांनी 92 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
लष्कराला मोठं यश जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे.
कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु करण्याआधी संपुर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसं ठार करता येईल याकडेही लक्ष दिलं जातं".
#FLASH: Infiltration bid foiled in Gurez sector of Jammu and Kashmir, three terrorists killed. Ops in progress pic.twitter.com/6ZaPc4F1HK
— ANI (@ANI_news) July 27, 2017