ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 4 - सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर पाकिस्तानकडून झालेल्या प्रत्येक गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देऊनही पाकिस्तानने त्यातून बोध घेतलेला नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या मानवरहीत विमानाने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले.
पाकिस्तानचे UAV विमान भारताच्या हद्दीत 400 मीटर आतपर्यंत म्हणजे उरीपर्यंत घुसल्याची प्रसारमाध्यमांची माहिती आहे. उरीमध्ये भारतीय लष्कराचा तळ आहे. ज्यावर सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते.
भारताने सर्जिकल स्ट्राईकची कारवाई करुन या हल्ल्याला चोख उत्तर दिले होते. सीमेवर मानवरहीत UAV विमाने टेहळणीसाठी वापरली जातात. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी बोलवलेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचा आढावा घेतला. सध्या भारत-पाकिस्तान संबंध रसातळाला गेले आहेत.