बोकारो - हिंदू असो, मुस्लीम असो किंवा घुसखोर असो आम्ही काहीही न बघता सर्वांना ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देऊ असं विधान झारखंडमधीलकाँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी केले आहे. घुसखोरांनाही सुविधा देण्याच्या काँग्रेस नेत्याच्या या विधानामुळे ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस उमेदवार कुमार जयमंगल यांच्या सभेत लोकांना संबोधित करताना गुलाम अहमद मीर यांनी हे वक्तव्य केले आहे.
चंद्रपुरा येथील जाहीर सभेत गुलाम अहमद मीर म्हणाले की, आम्ही हे वचन दिलंय, जर आमचे सरकार बनलं तर १ डिसेंबरपासून ४५० रुपयांत गॅस सिलेंडर उपलब्ध केले जातील. हे सर्वसामान्य लोकांना असेल. मग तो हिंदू असो, मुसलमान असो अथवा घुसखोर असो, झारखंडमधील सर्व लोकांना आम्ही गॅस सिलेंडर देऊ, कुणासोबतही अन्यायकारक विचार आम्ही करणार नाही असं त्यांनी म्हटलं. परंतु या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले आहेत. व्होट बँकेचे राजकारण करत असल्याने राज्यात घुसखोरांना प्रोत्साहन देण्याचं काम काँग्रेस करत आहे असा आरोप करण्यात येत आहे.
गुलाम अहमद मीर यांच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांनी घुमजाव केले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांनी म्हटलं. काँग्रेस लोकांमध्ये भेदभाव न करता मदत करते. भाजपा मागील १० वर्षापासून सत्तेत आहे मात्र घुसखोर कोण हे त्यांना ओळखता आले नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही भेदभाव करणार नाही असं गुलाम अहमद मीर यांनी सांगितले. झारखंड विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोर हा निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. नक्षलवाद आणि घुसखोरी यावर भाजपा नेते आक्रमकपणे बोलत आहेत. त्यात काँगेस नेत्याच्या विधानामुळे भाजपाला आयती संधी मिळाली आहे.
दरम्यान, स्वस्त गॅस सिलेंडर हिंदू, मुस्लीम आणि जे घुसखोर आहेत त्यांनाही देऊ असं काँग्रेस नेता झारखंडमध्ये बोलतोय. जे घुसखोरांना सांभाळतायेत त्यांना देशात कुठे संधी मिळावी का? उघडपणे काँग्रेस नेता ही घोषणा करतो. रोहिंगे, बांगलादेशी यांना स्वस्तात गॅस सिलेंडर देणार. व्होट बँकेसाठी देशातील पुढच्या पिढीच्या भविष्याची खेळ करतायेत याचे हे उदाहरण आहे. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करण्यात पुढे आहे परंतु देशातील गरिबांची शत्रू आहे. काँग्रेसला रोखण्याचं काम आपल्याला केले पाहिजे असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात पनवेल येथील सभेत केला.