नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे भावी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे महागाई नियंत्रण आणि आर्थिक वृद्धी यात समन्वय साधतील, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. या दोन परस्पर विरोधी घटकांचा मेळ घालताना पटेल यांना मोठी कसरत करावी लागेल, असे यावरून दिसते.ऊर्जित पटेल यांची नुकतीच रिझर्व्ह बँकेचे भावी गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. ४ सप्टेंबर रोजी ते रघुराम राजन यांची जागा घेतील. राजन यांनी महागाई नियंत्रणाला महत्त्व देऊन देशाचा आर्थिक विकास रोखला अशी टीका झाली आहे. विशेषत: भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन यांच्यावर कठोर प्रहार केले होते. या पार्श्वभूमीवर पटेल यांची निवड झाली आहे. वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, पतधोरण आखण्याचा दीर्घ अनुभव पटेल यांना आहे. त्यामुळे ते महागाईवर नियंत्रण मिळवतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. या पदासाठी पटेल यांची निवड करण्याचा निर्णय हा योग्यच असून, देशाच्या हिताचा आहे. वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले की, पटेल यांचा पतधोरण क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास पाहता, ते आपली निवड सार्थ ठरवतील. रिझर्व्ह बँक कायद्यानुसार सरकारने ठरवून दिलेल्या महागाईच्या मर्यादेचे पालन करण्यासाठी ते पतधोरणात योग्य निर्णय घेतील. तसेच ते आर्थिक वृद्धीचा समतोलही ठेवतील. रिझर्व्ह बँकेच्या सुधारित कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेची ही जबाबदारीच आहे.सरकारने महागाई ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यात २ टक्के कमी-अधिक होण्यास वाव आहे. मात्र सध्या ग्राहक वस्तू क्षेत्रातील महागाई ६.0७ टक्क्यांवर आहे. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी पटेल यांना तातडीच्या उपाय योजना कराव्या लागतील. रिझर्व्ह बँकेचे पुढील पतधोरण ४ आॅक्टोबरला जाहीर होईल. दास म्हणाले की, केवळ पतधोरण ठरविणे हे रिझर्व्ह बँकेचे काम नाही. ती बँका आणि वित्तीय संस्थांच्या नियमनाचेही काम करते. या भूमिकेतून त्यांना वित्तीय क्षेत्राचे काम उत्तम प्रकार चालेल, तसेच कृषी आणि लघु उद्योगासह विविध क्षेत्रात पतपुरवठा सुरळीत राहील, हे पाहावे लागेल. दुसरे वित्त राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी म्हटले की, पटेल हे अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर नेतील. त्यांचा अनुभव कमी असला तरी ते चांगले काम करतील, अशी मला खात्री आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
महागाई नियंत्रण, आर्थिक वृद्धीत समन्वय हवा
By admin | Published: August 23, 2016 5:30 AM