नवी दिल्ली - मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. आता मुंबईत सिलेंडरचे दर १,१०२.५० रुपये, नागपूरला १,१५४.५० रुपये, नाशिकला १,०५६.५० रुपये झाले आहेत. त्यामुळे होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत. तर १९ किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर ३५०.५० रुपयांनी वाढले आहेत. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. लोकल टॅक्स कारणाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑईल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा ही नवी दरवाढ करण्यात आली आहे.
सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहेत. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी ६ जुलैला घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ केली होती. गेल्या वर्षी चारवेळा गॅसच्या किंमती बदलल्या होत्या. कंपन्यांनी मार्च २०२२ रोजी ५० रुपये, मे २०२२ मध्ये ५० रुपये त्यानंतर ३.५० रुपये आणि जुलै २०२२ मध्ये ५० रुपये वाढ केली होती.
जगात महागाई घटली, भारतात मात्र वाढली! जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई कमी झालेली असताना. भारतात मात्र वाढली. गॅस, खते, कॉफी-चहा, कापूस आणि खाद्यतेल यांसारख्या १० वस्तूंचे दर भारतात दुप्पट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र, ते ४८ टक्के स्वस्त झाले आहे. जानेवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून ६.५% होण्यामागेही हेच कारण होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये महागाई ६ टक्क्यांच्या खाली आली होती. नैसर्गिक गॅस जागतिक बाजारात २८.६ टक्के स्वस्त झाला. भारतात मात्र तो ९५ टक्के महागला. जानेवारीत जागतिक बाजारात युरियाचे भाव सर्वाधिक ४७.६ टक्के कमी झाले. भारतात मात्र ते ५.२ टक्के वाढले.