नवी दिल्ली - देशातील जनतेला पुन्हा एकदा महागाईचा जबरदस्त मार सहन करावा लागणार आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती तब्बल 93 रूपयांनी वाढवल्या आहेत. विना सब्सिडीच्या सिलेंडरवर ही वाढीव किंमत लागू होणार आहे. नागरिकांना आजपासून (1 नोव्हेंबर) यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. या शिवाय सब्सिडी असलेल्या सिलेंडरच्या किंमतीही 4 रूपये 56 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत.
तब्बल 93 रूपयांची वाढ झाल्यामुळे विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये नागरिकांना 742 रूपये, कोलकातामध्ये 759 रूपये, चेन्नईत 750 रूपये तर मुंबईत 718 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1268 रूपये झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत चार रूपयांची वाढ होत होती मात्र आता अचानक किंमती भरमसाठ वाढवण्यात आल्या. वाढलेल्या किंमतीमुळे सब्सिडी असलेल्या सिलेंडरसाठी नागरिकांनी मुंबईत 498 रूपये मोजावे लागतील.