नवी दिल्ली - आधीच कोरोना महामारीचं संकट, त्यात महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचं जगणं मुश्कील बनलं आहे. कोविड लॉकडाऊननंतर तेलापासून मीठापर्यंत आणि तिखटापासून गॅस सिलेंडरपर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीची झळ शहरासह ग्रामीण भागालाही बसत आहे. महागाईविरोधात विरोधी पक्ष सातत्याने आक्रमक होत आहे. मात्र, सरकारला घामच फुटत नसल्याचे दिसून येते. आता, माजी मंत्री राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
देशात पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दराचा भडका उडाल्यामुळे ग्रामीण भागात चुली पेटायला लागल्या, पण आता या दरवाढीची झळ शहरातही जाणवू लागल्याने घर व फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल गृहिणींकडून विचारल्या जात आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचेही दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पेट्रोलने केव्हाच शतक पूर्ण केले आहे. तर, डिझेलही शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे, ट्रान्सपोर्ट खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत. भाजीपाल्यापासून ते पीठा, मीठापर्यंत सगळंच महागलं आहे. त्यावरुन, लालू प्रसाद यादव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
लालू प्रसाद यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजीपाला, फळं, डाळ, तेल, मसाले, पेट्रोल, डिझेल, गॅस, औषधं, भाडे... सगळं महागलंय. डबल इंजिन सरकारने खाद्यपदार्थांच्या खरेदीपासून ते अन्न शिवजवण्यापर्यंत देशात सगळं महाग करुन ठेवलंय. देशात आता माणसाचा जीव स्वस्त झालाय, कधी भूखबळीने, कधी आर्थिक तंगीने, तर कधी लिचिंगने लोकांचा जीव जातोय, असे ट्विट लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.
जानेवारीपासून 190 रुपयांनी महागलं सिलेंडर
कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत असल्याने महिन्याचे बजेट बिघडत आहे. गॅस दरात जानेवारी महिन्यापासून १९० रुपयांची दरवाढ झाली असून या महिन्यात ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. दरमहा सिलिंडरची भाववाढ नवा उच्चांक गाठत असून ही दरवाढ अशीच कायम राहिली तर शहरातील घरांमध्येही चुली पेटविल्याशिवाय पर्याय राहणार नाही.