नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ३५ पैसै प्रति लीटर दरवाढ केली आहे, दिल्लीत पेट्रोल ८६.६५ रुपये लीटर आहे, तर एलपीजी गॅस सिलेंडरचे दरही २५ रुपयांनी वाढले आहेत. विशेषत: यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कृषी सेस लावण्याचा निर्णय घेतला, मात्र यामुळे सामान्यांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही असं केद्र सरकारने दावा केला होता.
किती झाले सिलेंडरचे दर?
इंडियन ऑयलच्या माहितीनुसार, ग्राहकांना १४ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी जास्तीच दर मोजावे लागणार आहेत, एलपीजी सिलेंडर २५ रुपयांनी महागला असून दिल्लीत ७१९ रुपये, कोलकाता ७४५.५०, मुंबई ७१० तर चेन्नईमध्ये ७३५ रुपये प्रति सिलेंडर हा यापुढे दर असणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत जे कच्चे तेल येते त्यावर आंतरराष्ट्रीय दराचा परिणाम २०-२५ दिवसांनी दिसून येतो.
दिल्लीत गुरुवारी पेट्रोलचे दर ८६ रुपये ६५ पैसे प्रती लीटर आहेत, तर डिझेल ७६ रुपये ८३ पैसे प्रती लीटर आहे, याचप्रमाणे मुंबईत पेट्रोल ९३. २० रुपये, डिझेल ८३.६७, चेन्नई ८९.१३ रुपये तर डिझेल ८२.०४ रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर ८८.०१ रुपये तर डिझेल ८०.४१ रुपये आहे, नोएडा येथे पेट्रोल ८५.९१ रुपये तर डिझेल ७७.२४ रुपये प्रती लीटर आहे. मुख्यत: नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे महागाई वाढल्याची चिन्हे दिसतात.
डिझेलच्या भाववाढीने अनेक क्षेत्रावर परिणाम होतो, शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीची किंमत वाढते आणि माल वाहतूक वाढल्याने अनेक वस्तूंच्या किंमतीही वाढण्याची शक्यता असते. २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपये कृषी सेस लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या सेसचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही, हा सेस कंपन्यांना द्यावा लागेल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कृषी सेस लावल्यामुळे बेसिक एक्साइज ड्युटी आणि एडिशनल एक्साइज ड्युटीचे दरही कमी करण्यात आले आहेत.