नवी दिल्ली - लॉकडाऊनमुळे अगोदरच महागाई ओढवलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी महागाईचे चटके बसणार आहेत. कारण, लवकरच घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 60 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ओएनजीसी म्हणजेच ऑईल अँड नॅचरल गॅस एजन्सीकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार यांनी म्हटलं आहे की, जानेवारी ते मार्च 2021 मध्ये ओएनजीसीने 58.05 डॉलर प्रति बॅरेलच्या दराने क्रुड ऑईल म्हणजेच कच्च्या तेलाची विक्री केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात क्रुड ऑईल आणि गॅसच्या किंमती कमी झाल्याने कंपनीच्या महसुलावर त्याचा परिणाम झाला. मात्र, आता किंमती वाढत असून सरकारने देऊ केलेली सबसिडीही बंद केली आहे. सरकारच्या सबसिडीचा एक हिस्सा सरकारी तेल कंपनीला उचलावा लागत होता. परिणामी गेल्या तिमाहीत गॅसच्या किंमती कमी राहिल्या आहेत.
सरकार दर सहा महिन्यांनी घरगुती गॅसच्या किंमती निश्चित करते. जानेवारी ते मार्च या तिमाहीत गॅसचे दर 1.69 डॉलर प्रति बॅरल एम.एम.बी.टी यू राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे वाढलेले दर आणि संपलेल्या सबसिडीमुळे मार्च 2021 मध्ये ओएनजीसीला 6,734 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. यावर्षी कंपनीला 29,500 कोटी रुपयांचा नफा होईल, असा अंदाजही कुमार यांनी व्यक्त केला आहे.