नवी दिल्ली - देशाच्या संसदेत महागाईच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. देशात गेल्या 3 वर्षात महागाईने उच्चांक गाठला असून काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी महागाईवरुन संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे देशात महागाई वाढली नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटल्यामुळे, हा संताप अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार शक्ति सिंह गोहिल यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार प्रहार केला. सध्या, त्यांचं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेस खासदार शक्ति सिंह गोहिल यांनी राज्यसभेत महागाईच्या प्रश्नावर भाष्य केले. देशात काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात 400 रुपयांना असणारे घरगुती गॅस सिलेंडर आता 1100 रुपयांवर पोहोचले आहे. 400 रुपयांना सिलेंडर असतानाही एक महिला त्या सिलेंडरवर बसून आंदोलन करत होत्या, आता त्या कुठे गेल्या? असा प्रश्न विचारत सिंह यांनी भाजप नेत्या आणि मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य केलं. काँग्रेस सरकारच्या काळात सऊदी अमिरातच्या आकडेवारीनुसार, घरगुती गॅस म्हणजे एलपीजीची किंमत 885.2 अमेरिकन डॉलर प्रति मेट्रीक टन होती. त्यावेळी, आम्ही सिलेंडर 400 ते 415 रुपयांना देत होतो. आता, भाजप सरकारच्या कार्यकाळात मार्च 2022 मध्ये गॅस 769 अमेरिकन डॉलर प्रति मेट्रीक टन एवढा स्वस्त झाला आहे. तरीही, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 400 वरुन 1100 रुपयांवर पोहोचल्याचे शक्तिसिंह गोहिल यांनी म्हटले.
जेव्हा सिलेंडर 400 रुपयांना विकत मिळत होतो, तेव्हा एक महिला वीरांगना होऊन सिलेंडरच्या टाकीवर बसत होती. आता, सिलेंडर 1100 रुपयांवर पोहोचल्यानंतर, त्या महिला कुठे आहेत, त्यांनी निदान समोर तरी यावं, असे म्हणत सिंह यांनी स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला.