देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 04:46 AM2020-08-30T04:46:16+5:302020-08-30T04:47:00+5:30
स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.
नवी दिल्ली : काही देशद्रोही आणि गरीबविरोधी शक्ती सध्या देशात वैमनस्य व हिंसाचाराचे विष पसरवीत आहेत व देशाच्या लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत चालला आहे, असा आरोप करीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी मोदी सरकारवर आडून टीका केली.
सोनिया गांधी असेही म्हणाल्या की, देशात सध्या कुटिल विचारांचा बोलबाला आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे व लोकशाही संस्था नष्ट केल्या जात आहेत. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांतच भारतातील लोकशाही अशा प्रकारे धोक्यात येईल याची देशाचा पाया रचणाऱ्या धुरिणांनी कधी कल्पनाही केली नसेल.
छत्तीसगढच्या ‘नया रायपूर’ या नव्याने उभारण्यात येत असलेल्या राजधानीत विधानसभा संकुलाच्या पायाभरणी समारंभानिमित्त आधी ध्वनिमुद्रित करून पाठविलेल्या हिंदी संदेशात सोनियाजी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेला काही काळ देशाचा गाडा रुळावरून घसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. त्याने देशापुढे नवी आव्हाने उभी राहिली आहेत.
आज देश एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. गरीबविरोधी, देशद्रोही शक्ती, तसेच सत्तेत असलेले वैमनस्य आणि हिंसाचाराचे विष कालवून लोकांमध्ये आपसात भांडणे लावत आहेत.
प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल, विधानसभा अध्यक्ष चरन दास महंत व राज्याचे मंत्री उपस्थित होते. राहुल गांधी यांनीही दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल हजेरी लावली.
लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत
कोणाचेही थेट नाव न घेता काँग्रेस अध्यक्षा म्हणाल्या की, ते देशातील लोकांचा आवाज दडपू पाहत आहेत. तरुण पिढी, आदिवासी, महिला, शेतकरी, छोटे दुकानदार व जवान अशा सर्वांची तोंडे ते बंद करू पाहत आहेत. केवळ विधानसभेची भव्य वास्तू बांधून लोकशाहीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी आपणा सर्वांना लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन अविरतपणे झटावे लागेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.