नवी दिल्ली - आधार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जाते. मात्र सुमारे 200 हून अधिक सरकारी संकेतस्थळांवरूनच आधार कार्डधारकांची माहिती सार्वजनिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना यूआयडीएआयने ही माहिती दिली आहे. या घटनेमुळे आधार कार्डमधील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हा प्रकार नेमका कधी घडला याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र ही चूक आपल्याकडून घडली नसल्याचे यूएडीएआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीला उत्तर देताना यूएडीएयआयने म्हटले आहे की, "केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील सुमारे 210 संकेतस्थळांनी आधार कार्डधारकांची वैयक्तिक माहिती सार्वजनिक केली आहे. उघड झालेल्या माहितीमध्ये कार्डधारकांचे नाव, पत्ता आणि इरत माहितीचा समावेश आहे." हा प्रकार लक्षात येताच यूआयडीएआयने संबंधित संकेतस्थळांना ही माहिती काढण्याचे आदेश दिल्याचेही यूआयडीएआयने आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
यूआयडीएआयकडूव जारी करण्यात येणाऱ्या आधारकार्डवर देशातील प्रत्येक नागरिकाला 12 अंकांचा एका ओळख क्रमांक दिला जातो. जी त्या नागरिकाची ओळख आणि पत्त्यासाठी पुरावा मानला जातो.