नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक अर्हतेच्या माहितीचा शोध घेऊन ती माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उपलब्ध करून द्या, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने दिल्ली विद्यापीठ आणि अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाला दिले. माहितीचा अधिकार कायद्यान्वये (आरटीआय) मोदींच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती दिली गेली नसल्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आयोग संबंधित विद्यापीठांना मोदींच्या पदव्यांची माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश का देत नाही याचे आपणास आश्चर्य वाटते, असे गुरुवारी म्हटले होते. माहिती आयुक्त एम. श्रीधर आचार्युलू यांनी केजरीवाल यांच्या या विधानालाच आरटीआय अर्ज मानण्याचा निर्णय घेत दोन्ही विद्यापीठांना माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांना आयोगाच्या वस्तुनिष्ठतेबाबत शंका असल्याचे दिसते, असे निरीक्षणही आयुक्तांनी आपल्या आदेशात नोंदविले. आपल्यासंबंधी सरकार दरबारी असलेल्या नोंदी सार्वजनिक करण्यास आपला कोणताही आक्षेप नाही. तथापि, आयोग पंतप्रधान मोदी यांच्या शैक्षणिक पदवीची माहिती का लपवू पाहत आहे, असा सवाल केजरीवाल यांनी केला होता.पंतप्रधानांनी पदवी व पदव्युत्तर पदवी कधी प्राप्त केली याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आयोगाला पुरवावी जेणेकरून दिल्ली व गुजरात विद्यापीठांना त्याआधारे मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा शोध घेऊन ती उपलब्ध करून देणे सोपे होईल, असे केजरीवाल यांनी म्हटले होते. त्यावर आयोगाने नरेंद्र दामोदर मोदी यांच्या नावे १९७८ (दिल्ली विद्यापीठातून पदवी) आणि १९८३ (गुजरात विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी) या वर्षातील पदव्यांचा शोध घेऊन ही माहिती अर्जदार केजरीवाल यांना शक्य तितक्या लवकर पुरवावी, असे आदेश आयोगाने दिल्ली व गुजरात विद्यापीठ प्रशासनाला दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधानांच्या पदव्यांची माहिती द्या!
By admin | Published: May 01, 2016 1:44 AM