नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने परराष्ट्र मंत्रालयाला पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यासंबंधीच्या फायली मागविल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सुरक्षेचे कारण देत या दस्तऐवजांचा खुलासा करण्यास एका आरटीआय (माहितीचा अधिकार) अर्जाला नकार देण्यात आला होता. सेवानिवृत्त अधिकारी लोकेश बत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चाची माहिती मागविली होती. यावर परराष्ट्र मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या सुरक्षेच्या नियमांचा हवाला देत ही माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त राधाकृष्ण माथुर यांनी परराष्ट्र मंत्रालयाला निर्देश दिले की, या फायलींमध्ये सुरक्षाविषयक माहिती आहे का, याची खात्री करून घ्यावी. तसेच ही माहिती देण्यास नकार दिला जाऊ शकतो का? माथुर यांनी असेही सांगितले की, या फायली तपासून पाहिल्याशिवाय त्यात सुरक्षेसंबंधी खरोखर तपशील आहे का? आयोगाने मंत्रालयाला निर्देश दिले की, त्यांनी याबाबतची एक फाइल सादर करावी. बत्रा यांनी आयोगाच्या समोर सांगितले की, या प्रकरणात पर्याप्त जनहित आहे. एअर इंडियाला देण्यात येणारी कोट्यवधी रुपयांची रक्कम ही करदात्यांकडून वसूल करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
माहिती आयोगाला हव्या पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या फाइल्स
By admin | Published: October 29, 2016 2:39 AM