तेलंगणा- हैदराबादमध्ये होऊ घातलेल्या जागतिक उद्योजगता परिषदेच्या निमित्तानं राज्याला भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारनं नवी शक्कल लढवली आहे. तेलंगणा सरकारनं राज्य भिका-यांपासून मुक्त करण्यासाठी नवी योजना प्रत्यक्षात आणली आहे. या योजनेंतर्गत 1 डिसेंबरपासून भिका-यांची माहिती देणा-या व्यक्तीला सरकारतर्फे 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.विशेष म्हणजे पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षानंही या सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित केलं आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका व राज्य सुधारात्मक प्रशासन संस्था यासाठी एकत्रितरीत्या काम करणार आहेत. तसेच आतापर्यंत बेघर असलेल्या भिका-यांना शासकीय आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. तसेच यापुढेसुद्धा भिका-यांना सरकारी आश्रयस्थानात ठेवण्यात येणार असल्याची माहिती तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी दिली आहे.आमचा राज्यातील सर्व रस्त्यांना भिकारीमुक्त करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही 1 डिसेंबरपासून भिका-यांची माहिती देणा-या व्यक्तीला 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. हैदराबाद भीक मागणे प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येणार असून, भिका-यांच्या ठिकाणांची माहिती देणा-यांना आम्ही 500 रुपये देणार आहोत, असंही तेलंगणाचे पोलीस महासंचालक म्हणाले आहेत. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौ-याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी काळजी घेण्यात येत आहे. तेलंगणातील चंचलगुडा तुरुंग व चेरलापाली तुरुंगाजवळील आनंद आश्रमात रस्त्यावर भीक मागणा-या आतापर्यंत 111 पुरुष, 91 महिला आणि 10 चिमुकल्यांना ठेवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या अंगठ्याचे निशाण व फोटो घेण्यात आले आहेत. हैदराबादेतील बेगिंग अॅक्ट 1977अंतर्गत भीक मागताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला सहा महिने ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. परंतु भिका-यांवरील ही बंदी फक्त दोन महिन्यांसाठीच मर्यादित असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त एम. महेंद्र रेड्डी यांनी दिली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिच्या हैदराबाद दौ-याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी उपाययोजना करण्यात येत आहे. इवांका ट्रम्पचा हैदराबाद दौरा लक्षात घेऊनच शहरात भिका-यांना भीक मागण्यास दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या दौ-यादरम्यान हैदराबादमध्ये भिका-यांना भीक मागता येणार नाही. 8 नोव्हेंबर 2017 ते 7 जानेवारी 2018 पर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, नाक्यावर भीक मागणं किंवा लहान मुलांना अथवा अपंग व्यक्तींना भीक मागण्यास भाग पाडणं हा गुन्हा ठरणार आहे. या आदेशाचं उल्लंघन करणा-याला दंड ठोठावला जाईल असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हैदराबाद दौ-यावेळीही अशाच प्रकारे भीक मागण्यास बंदी घातली होती. इवांका ट्रम्प 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हैदराबादमध्ये होणा-या जागतिक उद्योजगता परिषदेत सहभागी होण्यासाठी येणार आहे. त्यानंतर शहरात विश्व तेलगू संमेलन सुरू होईल. हे संमेलन 5 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये हजारो तेलुगू एनआरआय सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी इवांका ट्रम्प यांना जागतिक उद्योजगता परिषदेचं नेतृत्व भारतात येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्याच निमंत्रणानुसार इवांका ट्रम्प भारतात येणार आहेत. हैदराबादमध्ये ही परिषद होणार आहे.
भिका-यांची माहिती देणा-याला आता मिळणार 500 रुपये, राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी सरकारची नवी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 10:16 PM