भारतीय कफ सिरप(सर्दीचे औषध)मुळे गांबियातील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी मोठे विधान केले आहे. 'भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू होणे, ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे भारतीय फार्मा रेग्युलेटरी एजन्सीची प्रतिमा मलीन झाली,' असे विधान नारायणमूर्ती यांनी केले आहे.
भारतासाठी लाजिरवाणी बाबसोमवारी इन्फोसिस पारितोषिक 2022 समारंभातील आपल्या भाषणादरम्यान नारायण मूर्ती यांनी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू होण्यावर चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे जगभरात भारताची लाज गेली. गेल्या 20 वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली, परंतु आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असे मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.
शिक्षणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताना नारायण मूर्ती म्हणतात की, जागतिक क्रमवारी 2022 मध्ये एकाही भारतीय शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. लस निर्मितीसाठीही इतर विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर किंवा संशोधनावर अवलंबून राहावे लागते. डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांवर आजही आपण लस शोधू शकलो नाही. या आजारांना आपण गेली 70 वर्षे झुंज देत आहोत,असंही ते म्हणाले.
यशाचे दोन मूलभूत मंत्रयावेळी नारायणमूर्ती यांनी यशाचे दोन मूलभूत मंत्र दिले. ते म्हणतात की, कोणताही शोध यशस्वी होण्यासाठी पैसा ही पहिली गरज नाही. असे असते तर पूर्व युरोपातील देश गणिताच्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. संशोधनातील यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम- आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जगातील सध्याच्या समस्यांशी निगडीत असले पाहिजे. दुसरे- आपल्या संशोधकांनी वर्तमानातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकतील.
WHO ने अलर्ट जारी केला होतावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने 5 ऑक्टोबर 2022 रोजी एक अलर्ट जारी केला होता की, इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने बनवलेले खोकला आणि सर्दीचे सिरप मृत्यू किंवा गंभीर मूत्रपिंडाच्या आजारासाठी जबाबदार असू शकते. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त होते. हे दोन घटक मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे.