ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 9 - इन्फोसिस या आयटीमधल्या दिग्गज कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स विकणार ही अफवा असल्याचे सध्यातरी दिसत आहे. इन्फोसिसच्या प्रतिष्ठित सहसंस्थापकांनी २८ हजार कोटी रुपये किंमतीचे १२.७५ टक्के शेअर विकण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले होते. त्यामुळे बाजारात प्रचंड खळबळ उडाली होती. मात्र, ही अफवा असल्याचे व आमचा असा कोणताही विचार नसल्याचे प्रवर्तकांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.
इन्फोसिस सारख्या बड्या कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर्स विकलेतर बाजारात प्रचंड उलथापालथ होईल हे उघड आहे. तीन वर्षापूर्वी प्रमोटर्सनी सक्रीय कामकाजातून अंग काढून घेतल्यावर इन्फोसिस चालविण्याच्या पद्धतीत बदल झाले म्हणून सह-संस्थापक वर्गात जास्त निराशा आहे, असं बोललं जातं होतं. त्यामुळेच ते आपला हिस्सा विकतील अशी चर्चा होती.
इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का आणि सह संस्थापक नारायण मूर्ती यांच्यात सुरू असलेल्या वादाचा इन्फोसिसला फटका बसणार आहे, असं बोललं जातं आहे. विशाल सिक्का आणि इतर दुसऱ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांना मिळणारा मोठा पगार, कंपनी सोडणाऱ्या सीएफओ राजीव बन्सल यांना दिलेल्या मोठ्या पॅकेजवरून सह संस्थापकांमध्ये मोठी नाराजी होती. इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबूलाल आणि के. दिनेश यांच्याकडे सध्या इन्फोसिसची कोणतीही कार्यालयीन कामकाजाची अर्थवा मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी नाहीये.
यासंदर्भात बोलताना आपण कंपनीचे समभाग विकत असल्याचे वृत्त खोटं असल्याचं एक सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी सांगितलं आहे. इन्फोसिस सोडण्याआधी कंपनीची सूत्रे सांभाळणारे नंदन निलेकणी यांनी या विषयावर बोलायला नकार दिला आहे.
तर दुसरीकडे इन्फोसिस सोडण्याआधी कंपनीचा व्यवहार पाहणारे नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसवर बोलायला नकार दिला आहे. त्यामुळे सध्यातरी ही अफवा असल्याचे दिसत आहे, परंतु सगळे काही आलबेल नसून विद्यमान सीईओ विशाल सिक्का न मूर्ती व निलेकणी यांच्यासह अन्य प्रवर्तक यांच्यात मतभेद असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे काही काळ कंपनीच्या घडामोडींकडे गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
एकाच वेळी प्रवर्तक सगळे शेअर विकण्याची अशीही शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.