बंगळुरु - नारळाच्या किंवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी नेहमी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नारळाच्या झाडावर चढताना दुर्घटना घडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या अनेक संकटावर मात करण्यासाठी कर्नाटकातील एका शेतकऱ्याने अनोख प्रयोग शोधून काढला आहे. मंगळुरु येथील गणपती नावाच्या शेतकऱ्याने नारळ किंवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी एक खास बाईक तयार केली आहे. ही बाईक एक लीटर पेट्रॉलमध्ये 80 झाडांवर चढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मान्सूनकाळात सुपारी अथवा नारळाच्या झाडांना किडे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या झाडांवर किटकनाशक फवारणी करणे गरजेचे असते. किटकनाशके फवारणीसाठी झाडाच्या टोकापर्यंत पोहचणं कठीण होऊन जातं. त्यामुळे दोरीच्या सहाय्याने अथवा बांबूच्या आधाराने शेतकरी झाडावर चढण्याचा प्रयत्न करतात.
गणपती या शेतकऱ्याने या संकटाला सामोरं जाण्यासाठी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि नवीन प्रयोग करत एक मशीन तयार केली. या मशीनच्या साहय्याने काही सेकंदात तुम्ही यावर बसून झाडाच्या टोकापर्यंत पोहचू शकता. त्यामुळे झाडाच्या टोकांवर किटकनाशके फवारणी करताना तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
या मशीनबाबत सांगताना गणपतीने सांगितले की, ही मशीन खासकरुन सुपारी आणि नारळाच्या झाडावर चढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचं वजन 28 किलो असून यावर 80 किलोचा माणूस सहजरित्या बसून झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. गणपतीने बनविलेल्या या बाईकला लोकांकडून मोठ्य़ा प्रमाणात मागणी सुरु झाली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी गणपतीकडे ग्राहकांची रांग लागली आहे. गणपतीची मुलगी सुप्रियाने सांगितले की, नारळाच्या अथवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी 8 मिनिटे लागतात मात्र या मशीनमुळे अवघ्या 30 सेकंदात तुम्ही झाडाच्या टोकापर्यंत पोहचू शकतात त्यामुळे वेळ वाचविण्यासाठीही या मशीनचा वापर होणार आहे.
गणपतीने बनविलेल्या या बाईकमुळे इतर शेतकरीही आनंदी आहेत. सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ही बाईक उपयोगाची ठरणार असून ही बाईक सहज उपलब्ध होऊ शकते आणि त्याची किंमतही कमी आहे. बाजारात मिळणाऱ्या मशीनपेक्षा गणपतीने बनविलेली बाईक वजनाने हलकी आणि स्वस्तही आहे असं शेतकरी राजारामने सांगितले.