गोमुत्र प्राशन केल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होतो; मी घेते, म्हणूनच कोरोना झाला नाही : खा. प्रज्ञा सिंह ठाकुर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:02 AM2021-05-17T11:02:28+5:302021-05-17T11:04:28+5:30
MP Pragya Singh Thakur : एका कार्यक्रमादरम्यान खा. प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी हा दावा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत होती. परंतु आता ती कमी होताना दिसत आहे. भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी गोमुत्राचा अर्क घेतल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होत असल्याचं म्हटलं. "मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. सर्व लोकांनी स्वदेशी गायीचं पालन केलं पाहिजे," असंही त्या म्हणाल्या. भोपाळमध्ये रविवारी आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"काही लोक मी गायब असल्याचं सांगत माझ्यावर बक्षिस घोषित करण्याच्या वार्ता करत आहेत. अशी लोकं सवैधानिक गुन्हा करत आहेत. त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं काम देवाचं आहे. मी माझ्या बंगल्यातूनच लोकांची मदत करत आहे. माझे सहकारीदेखील काम करत आहेत. केवळ आम्ही त्याचा प्रचार केला नाही. म्हणूनच मी गायब असल्याचं म्हणत आहेत," असं प्रज्ञा सिंह ठाकुर म्हणाल्या.
प्रत्येक व्यक्तीनं पिंपळ, वड आणि तुळस लावली पाहिजे. असं केल्यास अतिरिक्त ऑक्सिजनची गरज भासणार नसल्याचंही म्हटलं. यावेळी त्यांनी भोपाळमध्ये १ कोटी वृक्षारोपणाची घोषणा केली. तसंच ही झाडं जगवण्यासाठी पाण्याच्या टँकर्सचीही व्यवस्था केली जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.