श्रीनगर : काही वाईट शक्तींनी धर्माच्या नावाखाली माथी भडकविल्याने काश्मीरचा एक तरुम जिहादी बनण्यासाठी घर सोडून निघाला होता. यावेळी त्याच्या मनात एकच गोष्ट भिनभिनत होती की, काश्मिरींचे आणि इस्लामचे दुश्मन केवळ भारतीय फौजच आहे. अशातच जेव्हा त्याच्या हातात असॉल्ट रायफल मिळाली तेव्हा त्याने व्हिडिओ बनवत भारतीय सैन्याला हरविणार, कारण ते काश्मीरचे दुश्मन आहेत, असे सांगितले होते.
मात्र, जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या. आता एका हॉस्पिटलच्या खाटेवर झोपलेला आरिफ भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना सांगतोय की त्याच्याकडून चूक झाली. मला तुमच्यासारखी वर्दी घालायला हवी होती आणि देशाच्या संरक्षणासाठी बंदूक हातात धरायला हवी होती.
दक्षिण काश्मीरच्या बिजबाहाडाच्या फतेहपोरामध्ये आरिफ हुसैन बट राहत होता. त्याला आणि त्याच्या अन्य एक साथीदार आदील अहमद यांना गेल्या रात्री हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी एका बैठकीसाठी बोलावले होते. अंधारातच हे दोघे दहशतवाद्यांना भेटायला पोहोचले होते. आरिफला असे वाटले होते की, हिज्बुल आणि लष्कराचे दहशतवादी आमच्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले असतील. ते आमच्यासोबत मिळून भारतीय सैन्यावर हल्ला करणार असतील. मात्र मी चुकीचा होतो.
आरिफच्या म्हणण्यानुसार, आम्ही जेव्हा बागेत पोहोचलो तेव्हा आम्हाला घेरण्यात आले. आमच्यावर जिहादचे दुश्मन आणि पाकिस्तानच्या विरोधात गेल्याचा आरोप करण्यात आला. मारहाण करत आमच्याकडील शस्त्रे काढून घेतली. आदिलला माझ्यासमोरच गोळ्यांनी ठार करण्यात आले. पण त्यांनी मला मारले नाही. त्यांनी हिज्बुल किंवा लश्करमध्ये सहभागी होण्यास सांगितले. जेव्हा मी पळायला लागलो तेव्हा त्यांनी माझ्या पायावर गोळी मारली आणि सांगितले की तू नवीन आहेस म्हमून तुला सोडतोय.
आरिफला वाटले की आता आपल्याला भारतीय जवान सोडणार नाहीत. पोलिस येऊन मला गोळ्या घालतील. गोळी लागल्याने वेदना होत होत्या. जेव्हा जवान आणि काही नागरिक तेथे आले तेव्हा मला कोणी मारले नाही. जवानांनी फक्त एवढेच सांगितले की हत्यारे असतील तर खाली ठेव. तेव्हा त्याने जवानांना सांगितले की, मला गोळी लागलीय. त्यावर जवानाचे उत्तर ऐकून आरिफला रडू कोसळले. भारतीय जवानाने त्याला सांगितले होते, थोडक्यात वाचलायस, आम्ही तुला मरण्यासाठी असेच सोडून जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तुझे कुटुंबीयही तुला पाहण्यासाठी आतुरलेले असतील. माफी मागायचीच असेल तर त्यांची माग.
आरिफला शिक्षा होईल की नाही हे माहिती नाही. पण त्याने सांगितले की, त्याला आता पुरते माहिती झाले आहे की त्यांच्या शत्रू कोण आहे. मी जेव्हा घरी जाईन तेव्हा मशीदीत जाऊन माझ्यासारख्या तरुणांना फितवणाऱ्या शत्रूंविरोधात जिहाद पुकारणार असल्याचे त्याने सांगितले.