भोपाळ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एम्सच्या डॉक्टरांनी एका व्यक्तीवर अतिशय कठीण ऑपरेशन करून त्याचा जीव वाचवला आहे. आपांपसातील भांडणातून एका व्यक्तीच्या छातीत चाकू भोसकून मारलं होतं. जो डाव्या बाजूनं आर-पार गेला होता. रात्री उशीरा जखमी व्यक्तीला घेऊन काही लोक एम्स रुग्णालयात दाखल झाले. जखमी व्यक्तीला पाहताच हॉस्पिटलमध्ये उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांच्या अंगावर काटा आला कारण जखमी व्यक्तीच्या छातीत तब्बल १० इंच लांब असलेला चाकू अडकला होता. जो छातीतून आर-पार गेला होता.
रुग्णाची स्थिती इतकी गंभीर होती की जखमी मोठी असल्यानं त्यातून खूप रक्त वाहिलं होतं. जखमी व्यक्तीला एकमेकांच्या भांडणातून काही युवकांनी चाकू मारला होता. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीनं त्याची सर्जरी करत छातीत अडकलेला चाकू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. ट्रॉमा अँन्ड इमरजेन्सी विभागाचे हेड डॉक्टर मोहम्मद युनूस आणि त्यांच्या टीमनं जखमी रुग्णावर उपचार केले.
छातीत अडकलेला चाकू जवळपास अर्धा तास सर्जरी करून रुग्णाच्या छातीतून काढण्यात आला. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाचं नशीब बलवत्तर होतं. ज्या ठिकाणी हा चाकू घुसला होता तिथून २ इंचावर त्याचं ह्दय होतं. जर चाकू २ इंच डावीकडे घुसला असता तर त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता अधिक होती. या सर्जरीमध्ये मोहम्मद युनूस यांच्यासोबत डॉक्टर विक्रम बट्टी, डॉक्टर भुपेश्वरी पटेल, डॉक्टर शैलेश आणि डॉक्टर राहुल दुबेपुरिया यांचा सहभाग होता. सध्या डॉक्टरांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.