नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे भाजप सरकार शालेय शिक्षकांचे मानधन कमी करून त्यांच्यावर अन्याय करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केला. गांधी यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे.प्रसारमाध्यमात आलेल्या एका बातमीत सरकारी शाळांतील सुमारे ३० हजार कनिष्ठ शिक्षकांचे मानधन कमी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या बातमीत म्हटले होते की, आतापर्यंत या शिक्षकांना दरमहा ८,४७० रुपये मिळत होते ते आता सात हजार रुपये मिळतील. प्रियांका गांधी यांनी याच बातमीचा आधार घेऊन आदित्यनाथ सरकारवर टीका केली. राज्यातील भाजपचे सरकार या शालेय शिक्षकांवर अन्याय करीत आहे. त्यांना दरमहा १७ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले होते. प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या ८,४७० रुपये मानधनातही कपात करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशात शिक्षकांवर अन्याय : प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 12:56 AM