चुचुरा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पैसै चारल्याशिवाय सामान्य माणसांचे एकही काम होत नाही. या सरकारने बंगालच्या प्रत्येक क्षेत्रात सिंडिकेट राज स्थापन केले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केला.पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आलेल्या मोदी यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी सरकार आपली व्होटबँक शाबूत राखण्यासाठी अनुनयाचे राजकारण करत आहे. त्यापायी पश्चिम बंगालमधील सांस्कृतिक परंपरा, आदर्श व्यक्ती यांच्याकडे हे सरकार डोळेझाक करत आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुषमान भारतसारख्या योजनांच्या लाभापासून ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे शेतकरी, गरीब व्यक्तींना वंचित ठेवले. स्वातंत्र्यसेनानी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ज्या घरात वंदेमातरम् हे गीत लिहिले, ते घर मोडकळीस आले आहे. बंगाली अस्मितेच्या प्रतिकांकडे ममता बॅनर्जी यांनी कसे दुर्लक्ष केले, याचे हे ढळढळीत उदाहरण आहे.
तागाच्या उद्योगाचे आता कंबरडे मोडले
मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या औद्योगिक विकासाकडे ममता बॅनर्जी यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. या राज्यात पूर्वीच्या काळी भरभराटीला असलेल्या तागाच्या उद्योगाचे आता कंबरडे मोडले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तापरिवर्तन घडवायचे, असा निर्धार पश्चिम बंगालच्या जनतेने केला आहे. भाजप या राज्याला कुणाचा अनुनय करणारे नव्हे, तर विकासाला प्राधान्य देणारे सरकार देईल.