८ डिसेंबरला तामिळनाडूच्या कुन्नूरमधील नीलगीरीच्या जंगलात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. यामध्ये भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह १२ लष्करी अधिकाऱ्यांचे निधन झाले आहे. विंग कमांडर पृथ्वी सिंग चौहान ( Prithvi Singh Chauhan) आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे MI-17 चॉपरचं सारथ्य होतं. पृथ्वी सिंग चौहान यांच्यावर शनिवारी आग्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबीय भावनिक झाले होते. चौहान यांच्या शवपेटीवर तिरंगा होता आणि त्यांची कॅप त्यावर ठेवली होती. यावेळी मनाला चटका देणारा प्रसंग घडला. चौहान यांच्या ७ वर्षांच्या मुलानं अलगत ती कॅप उचलली त्यावर पडलेली फुलं साफ केली अन् ती कॅप स्वतः परिधान करून त्यानं वडिलांना अखेरचा सॅल्यूट केला.