नाशिक : एका आगळ्यावेगळ्या इको फ्रेन्डली संकल्पनेतून ‘बॉटनिकल गार्डन’च्या रूपाने एक नावीन्यपूर्ण प्रकल्प नाशिकला मिळाला. हा प्रकल्प निसर्गप्रेमींना निश्चित आकर्षित करणारा आहे, असे मत टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी उद्यानाला दिलेल्या भेटीप्रसंगी व्यक्त केले. पांडवलेणीच्या जवळ असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचा विकास करून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारण्यात आलेल्या ‘बॉटनिकल गार्डन’ला रतन टाटा यांनी राज ठाकरे यांच्यासमवेत सोमवारी (दि. ३०) भेट दिली. यावेळी त्यांनी उद्यानात इको फ्रेण्डली वाहनातून फेरफटका मारत विकासकामांची पाहणी केली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास टाटा यांचे उद्यानात आगमन झाले. फुलपाखरूच्या आकारामध्ये तयार करण्यात आलेले उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार पाहून टाटा यांनी आनंद व्यक्त केला. ठाकरे व टाटा यांनी येथील बालोद्यान कक्षामध्ये उभारण्यात आलेल्या आशियाई व आफ्रिकन हत्तींच्या प्रतिकृती न्याहाळल्या. तेथून ‘कथा अरण्याची’ या संकल्पनेतून खुले नाट्यमंचाच्या ठिकाणी साकारण्यात आलेल्या लेझर शो-बोलक्या झाडांची पाहणी केली. यावेळी संबंधितांकडून रतन टाटा यांना सदर पर्यावरणपूरक निसर्ग संवर्धनासाठी प्रबोधनात्मक संकल्पना विशद करण्यात आली. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन टाटा यांचे नाशिककरांच्या वतीने स्वागत केले. वनविकास महामंडळ, टाटा ट्रस्ट व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू वनोद्यानाचा विकास साधला गेला आणि ‘बॉटनिकल गार्डन’ उभारण्यात आले. या प्रकल्प उभारणीला टाटा ट्रस्टने सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला वो फायबर के पेड हैं...‘अभी हमने जो पेड देखें वो फायबर के हैं, और रात में ये बाते करते हैं...’ असा संवाद राज ठाकरे यांनी उद्यानातून बाहेर पडत असताना रतन टाटा यांच्याशी साधला. यावेळी टाटा यांनी मनमोकळे हसत त्यांना दाद दिली. ‘ये प्रोजेक्ट बहुतही बेहतर हैं और नासिक की बडी मिसाल कायम करेगा’ असे मत त्यांनी ठाकरे यांच्याशी फेरफटका मारताना व्यक्त के ले.
नाशिकला नावीन्यपूर्ण प्रकल्प
By admin | Published: January 31, 2017 1:53 AM