नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताकदिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे.
ज्यांनी दिल्लीत हिंसाचार केला त्यांच्यावर तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या संघटनांविरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत व कडक कारवाई करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा. हिंसाचार करणाऱ्यांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. ही याचिका अॅड. विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांची समिती नेमून दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी. ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक जण जखमी झाले व सार्वजनिक, खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे.साऱ्या जगाचे वेधले लक्ष सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल झालेल्या याचिकेत म्हटले आहे की, दिल्लीतील हिंसाचाराचे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
या हिंसाचारामागे कारस्थानही असू शकते. त्यामुळे या सर्वच गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये आयोजित शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला मंगळवारी लागलेल्या हिंसक वळणामध्ये तीनशेहून अधिक पोलीस जखमी झाले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २२ गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक मारून तिथे तिरंगा उतरवून खलिस्तानचा ध्वज फडकावल्याचा आरोप समाजमाध्यमांतून झाला होता. पण तो खरा नसल्याचे एका व्हिडीओतून स्पष्ट झाले आहे.
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले आंदोलन चिघळले आहे. नवीन कृषी कायदे रद्द करा, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत व केंद्र सरकारला ते मान्य नाही. दिल्लीच्या ज्या भागात ट्रॅक्टर मोर्चेकऱ्यांना येण्यास बंदी केली होती, तिथे ते आल्याने पोलिसांनी त्यांना अडविले. शेतकरी व पोलिसांमध्ये मोठी चकमकही झाली. आंदोलकांनी अनेक वाहने उलटवून दिली.
‘तो’ ध्वज खलिस्तानचा नव्हे, तर, शीख धर्माचा
लाल किल्ल्यामध्ये घुसून आंदोलकांनी तिथला तिरंगा ध्वज उतरविला व त्याऐवजी खलिस्तानचा ध्वज फडकाविला, असा आरोप मंगळवारी झाला होता. मात्र त्यासंदर्भात समाजमाध्यमावर झळकलेल्या एका व्हिडीओत असे स्पष्ट दिसते आहे की, लाल किल्ल्यावरील तिरंगा ध्वज डौलाने फडकत असून त्याच्या शेजारी एक काठी रिकामी होती, त्यावर आंदोलकांपैकी एकाने भगव्या, पिवळ्या रंगाचे फडकविलेले ध्वज हे खलिस्तानचे नाहीत. त्यातील भगवा ध्वज शिखांचा धार्मिक ध्वज आहे. त्याला ‘निशाण साहिब’ म्हणतात.