नवी दिल्ली : पैशांच्या अफरातफरीप्रकरणी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात पोहोचले असून चौकशी सुरु झाली आहे. त्यांच्यासोबत प्रियंका याही आल्या होत्या मात्र, त्या गेटवरून माघारी परतल्या. 16 फेब्रुवारीपर्यंत ईडी वाड्राना अटक करू शकत नाही.
हे प्रकरण लंडनमधील एका मालमत्तेच्या खरेदीबाबत आहे. वाड्रा यांचे सहकारी सुनिल अरोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अरोरा यांनाही 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे. त्यांनी लंडमधील 12, ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ 17 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रींग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीचा असा दावा आहे की, या मालमत्तेचे खरे मालक वाड्रा हे आहेत. ईडीने न्यायालयामध्ये हे पैसे 2009 मध्ये पेट्रोलियम व्यवहारातून मिळाल्याचे सांगितले आहे. मात्र, वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
ईडीने न्यायालयात सांगितले की, लंडनमधील सदनिका फरारी संरक्षण दलाल संजय भंडारीने 16 केटी 80 लाख रुपयांना खरेदी केली होती. या सदनिकेच्या दुरुस्तीवर 65,900 पाऊंड खर्च होऊनही भंडारीने ही सदनिका 2010 मध्ये याच किंमतीमध्ये वाड्रा यांच्या नियंत्रणातील कंपनीला विकली.