नवी दिल्ली: तामिळनाडूमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि अन्य 12 जण ठार झाले. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांसाठी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांनी दोन मिनिटे मौन पाळला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही सभागृहांना अपघाताची माहिती दिली आणि अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यासाठी प्रार्थना केली.
घटनेची उच्चस्तररीय चौकशीसंरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने ट्राय सर्व्हिस पथकाद्वारे चौकशीचे आदेश दिले आहेत आणि एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी होणार आहे. तसेच, शुक्रवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि इतर अधिकाऱ्यांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशीही माहिती त्यांनी दिली.
एअर मार्शल मानवेंद्र सिंग हे हेलिकॉप्टर पायलट आहेत
भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअर मार्शल मानवेंद्र सिंग हे काल क्रॅश झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एमआय-17 च्या ट्रास सर्व्हिस तपासाचे नेतृत्व करत आहेत. मानवेंद्र सिंग हे भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडर आहेत आणि ते स्वतः हेलिकॉप्टर पायलट आहेत.
लँडिंगच्या सात मिनिटांपूर्वी संपर्क तुटला
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, IAF च्या Mi 17 V 5 हेलिकॉप्टरने काल सकाळी 11:48 वाजता सुलूर एअरबेसवरून उड्डाण केले आणि दुपारी 12:15 पर्यंत वेलिंग्टनमध्ये उतरणे अपेक्षित होते. मात्र सुलूर एअरबेसवरील एअर ट्रॅफिक कंट्रोलचा 12.08 च्या सुमारास हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला.