नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मंत्री म्हणून ओळखले जाणारे आपचे नेते आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली. सत्येंद्र जैन यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्येंद्र जैन यांनी 2015-16 मध्ये तीन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा मिळविल्याचा आरोप आहे. प्रायाज इन्फो सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अकिनन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मनगलियातन प्रोजक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या शेअरमधून कथितरित्या कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबीयांचे सुद्धा या कंपनांमधून शेअर आहेत. दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्यावर 11.78 कोटीचा हवाल्याचाही आरोप आहे. 2010-12 दरम्यान बनावट कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इन्कम टॅक्स विभागाने बेनामी संपत्ती कायद्याच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे आहे. सीबीआय सुद्धा त्यांची चौकशी करत आहे.