मुंबई : आयएनएस मुरगाव डी-६७ ही भारतीय नौदलाची पी १५ बी श्रेणीची दुसरी स्टील्थ गाईडेड मिसाईल विनाशिका नौदलाच्या ताफ्यात रविवारी दाखल झाली. डॉकयार्ड येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सीडीएस जनरल अनिल चौहान, नौदलाचे व्हाइस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर, तसेच व्हाइस ॲडमिरल नयन प्रसाद (निवृत्त) आदी मान्यवर उपस्थित होते.
नौदलाच्या युद्ध नौका डिझाइन ब्युरोने ही युद्ध नौका डिझाइन केली आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापरात लक्षणीय वाढ केल्याने, पी १५ बी विनाशिका युद्ध नौका निर्मिती हे आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस मुरगाव हे स्टील्थ, युद्ध शक्ती आणि सुलभ हाताळणी याचे मिश्रण आहे. या नौकेची बांधणी १७ सप्टेंबर, २०१६ ला सुरू झाली आणि १९ डिसेंबर, २०२१ रोजी गोवा मुक्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी या नौकेची समुद्र सफर सुरू झाली.
३०० कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सुविधा१९६१ मध्ये १८ डिसेंबरला पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरुवात आली होती. त्यामुळे १८ डिसेंबर रोजी विनाशिका नौदलात दाखल होणे याला विशेष महत्त्व आहे. गोव्यातील ऐतिहासिक किनारी शहराच्या नावावरून आयएनएस मुरगावचे नाव ठेवण्यात आले आहे. या नौकेवर ३०० हून अधिक कर्मचारी-अधिकारी राहू शकतात.