जाणून घ्या मोदींच्या दाव्यातील तथ्य; INS विराटचा वापर राजीव गांधींनी कधी आणि केव्हा केला होता?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 10:23 AM2019-05-09T10:23:47+5:302019-05-09T10:24:48+5:30
राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का?
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापू लागलंय. रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते
कधी साजरी केली सुट्टी?
इंडिया टूडे या चॅनेलच्या बातमीनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी 1987 मध्ये नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गांधी कुटुंब आणि काही खास मित्रांसोबत एका बेटावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी 10 दिवस ते राहिले होते.
सुट्टी साजरी करण्यासाठी कोणत्या ठिकाणी गेले होते?
लक्षद्वीप येथील सुंदर असं बंगाराम बेटावर राजीव गांधी, त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. बंगाराम बेट हे अतिशय सुंदर आणि अप्रतिम बेट आहे.
गांधी परिवारासोबत कोण कोण होतं?
राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत या पर्यटनात राहुल आणि प्रियंका गांधी यांचे मित्र, सोनिया गांधी यांची बहीण तसेच कुटुंब, सोनिया गांधी यांची आई, भाऊ आणि मामा सहभागी होते. तसेच राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंहीसोबत होती. तीन मुलांमध्ये अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांच्या मुलीचाही समावेश होता.
गोपनीय दौरा मिडीयात उघड झाला
गांधी कुटुंबीयांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र तरीही ही बातमी माध्यमांसमोर आली. त्यानंतर अनेक विवाद झाले. राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली.