बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे बंधू आणि मंत्री एच. डी. रेवण्णा नव्या वादात सापडले आहेत. पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्या अंगावर बिस्किटांचे पुडे फेकण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील आश्रयछावणीमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेवण्णा यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेवण्णा 'असंवेदनशील' असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.एच.डी. रेवण्णा हसन जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळेस बिस्किटांचे पुडे लोकांच्या हातामध्ये देणे शक्य असूनही ते त्यांच्या दिशेने फेकत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर रेवण्णा यांनी किमान संवेदनांचे भान राखत वागायला हवे होते अशा भावना व्यक्त होत आहेत. रेवण्णा यांच्याबरोबर अर्कालगुडुचे मदार एटी रामस्वामीसुद्धा उपस्थित होते.
कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:27 AM