श्रीनगर : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा केंद्र सरकारने रद्द केल्याच्या घटनेस पाच महिने उलटले असून त्यानंतर तेथील परिस्थितीची पाहणी अमेरिकेसह १५ देशांच्या भारतातील राजदूतांनी गुरुवारी केली. या राजदूतांचे शिष्टमंडळ जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर आहे. त्यामध्ये युरोपीय समुदायातील देशांच्या राजदूतांचा समावेश नाही. काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवायांबाबत भारतीय लष्कराच्या प्रतिनिधींनी या राजदूतांना माहिती दिली. काश्मीर खोºयातील काही नागरिकांशी राजदूतांच्या शिष्टमंडळाने संवाद साधला.काश्मीरमधील स्थानिक नेते तसेच अटकेत असलेले माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधण्यास केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याने युरोपीय समुदायातील देशांच्या भारतातील राजदूतांनी काश्मीरला भेट देण्यास नकार दिला. त्यामुळे ते वगळून अमेरिका, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, ब्राझिल, उझबेकिस्तान, नायजेरिया, मोरोक्को, अर्जेंटिना आदी १५ देशांच्या राजदूतांचे शिष्टमंडळ एका विशेष विमानाने गुरुवारी श्रीनगरमध्ये आले. ते जम्मूला रवाना झाले.काश्मीरमध्ये नेमके काय घडत आहे हे जाणून घेण्याकरिता युरोपीय पार्लमेंटच्या सदस्यांनी आॅक्टोबर महिन्यात भेट दिली होती. त्यावेळी काश्मीरमध्ये स्थानिक संघटनांनी बंद पुकारला होता. आता पंधरा देशांच्या भारतातील राजदूतांचे शिष्टमंडळ काश्मीरमध्ये आले तेव्हा तिथे शांत वातावरण आहे. या राजदूतांना काश्मीरमधील स्थितीबद्दल लेफ्टनंट जनरल के. जे. एस. धिल्लाँ यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने सविस्तर माहिती दिली.काश्मीर खोºयातील निवडक नागरिकांबरोबर झालेल्या चर्चेत अमेरिकेचे भारतातील राजदूत केनिथ जस्टर यांनी रिअल काश्मीर फुटबॉल क्लबचे मालक संदीप चट्टू यांच्याकडून माहिती मिळवली. माजी मंत्री अल्ताफ बुखारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळालाही हे राजदूतभेटले. (वृत्तसंस्था)>ही तर गाईडेड टूर : काँग्रेसराजदूतांची काश्मीर भेट ही गाईडेड टूर असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली आहे. देशातील राजकीय नेत्यांना काश्मीर जाण्यास प्रतिबंध करणारे केंद्र सरकार विविध देशांच्या राजदूतांना मात्र तिथे घेऊन जाते. हा दुतोंडीपणा असल्याचे ते म्हणाले. राजदूतांच्या शिष्टमंडळाची भेट घेणारे अल्ताफ बुखारी यांना साथ दिल्याबद्दल पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने आठ नेत्यांना पक्षातून काढून टाकले आहे.
१५ देशांच्या राजदूतांकडून काश्मीरमध्ये पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:50 AM