प्रेरणादायी! ८५ हजाराची नोकरी सोडून इंजिनिअर करतोय शेती; हजारो रुपयांची भाजी पिकवतेय गावची माती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 11:57 AM2023-03-01T11:57:35+5:302023-03-01T12:45:01+5:30
महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे
उत्तराखंड राज्यात डोंगराळ प्रदेशातील तरुण वर्ग गाव सोडून शहरात नोकरी-उद्योगधंद्यासाठी जात आहे. मात्र, चमोली जिल्ह्यातील सरतोली गावच्या महेंद्र सिंह बिष्टा हे तरुणांना भाजीपाला लागवड अन् फुलांच्या शेतीतून रोजगार निर्मित्तीसाठी प्रेरणा देत आहेत. महेंद्रचा हा प्रेरणादायी उपक्रम पाहून त्याला सरकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून सन्मानित केलं जात आहे. तर, इतरही युवकांना महेंद्रपासून प्रेरणा मिळाली असून तेही आता भाजीपाला लागवड आणि फुलांच्या शेतीकडे आकर्षित होत आहेत.
महेंद्र सिंह यांनी १७ वर्षांपूर्वीच आपले मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर, ते राजधानी दिल्लीतील ओमॅक्स ऑटो लिमिटेड कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजरच्या पदावर कार्यरत होते. तेथे दरमहा ८५ हजार रुपये पगारही त्यांना मिळत होता. मात्र, सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी स्वयंरोजगाराची इच्छा व्यक्त करत गावाकडची वाट धरली.
गावाकडे आल्यानंतर ग्रामीण भागातील पडीक जमीन २० वर्षांसाठी भाडेतत्त्वार घेत महेंद्रसिंह यांनी भाजीपाला लागवडीचा व्यवसाय सुरू केला. त्यासोबतच, दुग्धव्यवसायाचाही उद्योग सुरू केला आहे. सध्या महेंद्रला या उद्योगातून दरमहा ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. महेंद्र यांच्या उत्तम भाजीपाला लागवडीच्या कामांना पाहून आयएसएचआरडी (इंडियन सोसाइटी ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च एण्ड डेव्हलपमेंट इंस्टिट्यूट) ने त्यांना २०१९-२० साठी पंतनगर कृषि विविमध्ये आयोजित कार्यक्रमात देवभूमि बागवानी पुरस्काराने सम्मानित केले.
डोंगराळ प्रदेशात रोजगार म्हणजे केवळ नोकरीकडे पाहिले जाते. मात्र, डोंगराळ भागात नोकरीच्या संधीही कमी असतात. त्यामुळे, राज्यातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच, महेंद्रने गावाकडची वाट धरत भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रीत केले. त्याने सध्या, २०० निंबू आणि ५० किवीच्या झाडांची लागवड केली आहे. यांसह, मौसमी फळभाज्यांसह पॉलिहाऊसमध्ये बैमौसमी भाज्यांचीही लागवड महेंद्रद्वारे केली जात आहे.