बारामुल्ला - काश्मीर म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो दहशतवाद, कट्टरता, हिंसाचार. अशा सातत्याने अशांततेची शिकार झालेल्या परिसरात चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर काश्मीरमधील सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान ठरत आहे. ही कहाणी आहे बारामुल्लामधील मुलींच्या सरकारी महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या इन्शा आणि तिच्या संघसहकाऱ्यांची. काश्मीर खोऱ्यामधील उत्तर काश्मिरमधील उपनगरात ती राहते. "मला बिनधास्त आणि स्वतंत्र होऊन जगायचे आहे." हे तिचे शब्द तिच्या विषयी सर्व काही सांगून जातात. सरकारी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या 21 वर्षीय इन्शा हिने कर्णधार म्हणूनही आपल्या नेतृत्वाची चमक दाखवली आहे. तिच्या नेतृत्वाखाली तिच्या महाविद्यालयाच्या संघाने नुकत्याच आटोपलेल्या आंतरविद्यापीठ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इन्शा ती सुरुवातीला बुरखा घालून क्रिकेट खेळत असे. सुरुवातीच्या काळात तिला आसपासच्या लोकांकडून बरेच टोमणे ऐकून घ्यावे लागत असत. आता मात्र ती हिजाब घालून आपल्या बॅटसह स्कूटीवरून कॉलेजमध्ये ये-जा करते. इन्शा सांगते, "माझा क्रिकेटमधील प्रवास निश्चितच सोपा नव्हता. मी जेव्हा बॅट घेऊन जात असे तेव्हा आसपासचे लोक माझ्या वडलांकडे तक्रार करत. पण माझ्या कुटुंबाने मला भक्कम पाठिंबा दिला." इन्शा काश्मीरमधील एक गुणवान क्रिकेटपटू आहे. तिने क्रिकेटमध्येच नाही तर हॉलीबॉलमध्ये सुद्धा जम्मू आणि काश्मीरचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. आमीर खानचा प्रसिद्ध कार्यक्रम असलेल्या सत्यमेव जयतेचे शीर्षक गीत त्यांनी आपले प्रेरणागीत बनवले आहे. त्यांच्या संघातील बहुतेक जणी ह्या हिजाब आणि स्कार्फने डोक्यापासून गुडघ्यांपर्यंतचे शरीर झाकून क्रिकेट खेळतात. काहीजणी तर बुरखा घालूनच खेळण्यास येतात. पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली रबिया त्यांच्यापैकीच एक. अष्टपैलू क्रिकेटपटू असलेली रबिया बारामुल्लामध्ये खेळताना बुरखा घालून क्रिकेट खेळते. मात्र श्रीनगरमध्ये खेळताना ती हिजाब घालून फलंदाजीस येते.मी माझ्या शिक्षकांच्या इच्छेविरुद्ध जाऊ शकत नाही, असे रबिया सांगते. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या रबियाचे पालक रोजंदारीवर काम करतात. तसेच ती राहत असलेल्या बारामुल्लामधील परिसरात जमात ए इस्लामिया यांचे वर्चस्व आहे. इन्शा हिची क्रिकेटमधील आवड तिच्या महाविद्यालयातील उर्दूच्या शिक्षकांनी सर्वप्रथम पारखली. तर महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्यांना सरावासाठी आवारात क्रिकेटचे छोटे मैदान उपलब्ध करून दिले. तर तिचे वडीलही समाजाचा विरोध पत्करून तिच्यामागे ठामपणे उभे राहिले. "कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना" असे म्हणत ते समाजाचा विरोध धुडकावून लावतात.
प्रेरणादायी! बुरखा आणि हिजाबमध्ये क्रिकेट खेळून त्या लढताहेत समतानतेची लढाई
By balkrishna.parab | Published: October 02, 2017 4:13 PM